Friday, April 30, 2010

एक नातं- मैत्रीचं

एक नातं
शब्दांच्या पलिकडलं
मौनाताल्या स्पन्दनांनी
मनातलं गुपित ओळखणारं

एक नातं
खूप धीर देणारं
स्पर्शाविनाही
जवळ घेउन समजावणारं

एक नातं
दिलासा देणारं
आपल्याला स्वतःचीच
नविन ओळख करून देणारं

एक नातं
नावाचं कुंपण नसणारं
क्षितिजाच्या कुशीत
हळुच जाउन विसावणारं

आठवण

सान पहाट किरणांची
गार वाट ती धुक्याची
वाफ आल्याच्या चहाची
काढ़े आठवण तुझी !!

रम्य दीस ते कोंलेज़चे
नव्या -जुन्या सोबत्यांचे
वडा -पाव च्या पार्टीचे
काढ़े आठवण तुझी !!

कट्यावरील गप्पा -गोष्टींचे
खोट्या हसण्या -रुस्ण्याचे
काही चोरट्या कटाक्षांचे
काढ़े आठवण तुझी !!

क्षण वर्गातल्या खोडयांचे
प्रश्न नको त्या परीक्षांचे
मार्क्स काठावरल्या पासींगचे
काढ़े आठवण तुझी !!

आज जरी नाहीस तू इथे
तुझ्या नयनी मला दिसे
त्याच काळातील ठसे
काढ़े आठवण माझी !!

Sunday, April 25, 2010

मुलींच्या शाळेचा पहिला दिवस (मी कामानिमित्त परदेशी असतांना)

माझ्या चिमण्या पिल्लांची
आज सुरु झाली शाळा
अनोळखी वाटेवर
नको रडू माझ्या बाळा

नविन कपडे, नवी पुस्तके
आणतील गोड हसू गाली
नव्या सख्यांशी खेळता
जाईल डोळ्यातील पाणी

बाबा, आजी, मावशी
असतील आणावयास आलेले
सुरात ऐकवा त्यांना
बोबडे बोल शिकवलेले

जरी नसले मी तेथे
तुमची बोटे धरावया
आहे नज़र तुमच्यापाशी
हात आशीर्वाद द्यावया

पडो पाउल तुमचे
आता यशाच्या दिशेने
येईन धावतच मी ही
तेथे तुमच्या ओढ़ीने