Monday, September 27, 2021

बदल-फूल ते बाभळी

काहींच्या बोचऱ्या काट्यांनाही,

फुले समजून ओंजारायचे!

आमच्या पायघडयांनाही ,

काटे समजून झिडकारायचे!


अशानेच कधीतरी मग,

होते फुलांचीही बाभळी!

त्या बदलाचे खापरही,

फोडले जाते आमच्याच भाळी!!

Tuesday, September 14, 2021

ती

 ती निरागस, निष्पाप,

कधी हसरी, लाजरी,

कधी खट्याळ, खोडकर, 

ती लेक लाडाची!! 


ती हट्टी, स्वप्नाळू, 

कधी स्पष्ट, विचारी,

कधी प्रेमळ, लाघवी,

ती तरुणी, महत्वाकांक्षी!! 


ती निर्मळ, समजूतदार,

कधी बेभान अन् बरसणारी, 

कधी सावध अन् सावरणारी, 

ती, एक अर्धांगिनी!! 


ती ममता, वात्सल्य, 

कधी कौतुकाने खुलवणारी,

कधी प्रेमाने दटावणारी, 

ती, एक जन्मदात्री!! 


ती कर्तव्यदक्ष, 

ती सतत कामात व्यस्त,

ती सगळ्यात सामावणारी, 

सगळ्यांना सामावून घेणारी, 

ती सगळ्यांसाठी तत्पर, 

तरीही दुर्लक्षिलेली!

ती स्वतःलाच विसरलेली, 

ती एक गृहिणी!!