Saturday, August 31, 2013

फक्त तुझ्याचसाठी....

आज मला पुन्हा जगायचंय...
आनंदाने बागडायचंय,
पावसात चिंब भिजायचंय,
तुझ्या आठवणीत रमायचंय!
हो, मला आता पुन्हा जगायचंय!!


तूच दिलीस मज नवी आशा,
नवी पालवी, नवी दिशा...
ह्या अस्तित्वाला नवे रूप,
अन आपल्या नात्याला नवे स्वरूप!
तुझ्या सहवासात, स्वतःला विसरायचंय...
हो, मला आता पुन्हा जगायचंय!!


तालास सूर मिळता,
संगीत जसे खुलावे...
तुज साथ माझी मिळता,
जीवन तसे खुलावे!
तुझ्याच सुखासाठी सर्वस्व वहायचंय...
हो, मला आता पुन्हा जगायचंय!!


तुझ्या दुखांना हरवायचंय...
तुझ्या स्वप्नांना सजवायचंय...
तुझ्या स्पर्शाने शहारायचंय...
तुझ्या प्रेमात विरून जायचंय...
तुझ्याचसाठी जगायचंय....
फक्त तुझ्याचसाठी!!!!

 

Monday, July 29, 2013

अस्तित्व

कळतील का तुला कधी,
माझ्या मनातील भाव?
पाहशील का कधीतरी,
माझ्या स्वप्नातील गाव?

विसावेल का मजपाशी--
कधी, तुझ्या विचारांची धाव?
तुझ्या व्यापात आहे का रे,
माझ्या आठवणींना वाव?

घेशील का मम कवितेतल्या,
तुझ्या सुरांचा ठाव?
असेल का रे तव भूतकाळाच्या कुपीत,
कुठेतरी, निदान माझे नाव?

Thursday, May 16, 2013

पहाट

पाकळ्यांचे उधळूनी रंग,
एक काळी हलकेच उमलली..
गोड, गुलाबी हसू घेऊनी,
नवप्रभात दारी आली!

निळ्या आभाळी, प्रातःकाळी,
कोकीळ गातो भूपाळी....
दवबिंदुचा सडा शिंपतो,
निसर्ग बनुनी वनमाळी!

नाट्याच्या अंतिम अंकाला,
रविराजाची चाहूल लागली....
त्या तेजानी धरतीवरच्या,
स्वर्गाची शोभा मम अनुभवली!!

Sunday, March 3, 2013

आई

तुमच्या येण्याची वेळ,
तिला साधारण माहित असते..
पण आधीपासूनच ती,
तुमची वाट बघत बसते....
कारण, ती एक आई असते!

तुमच्या आवडी-निवडी,
ती नकळतपणे संभाळते...
तिच्या आवडीची मात्र,
तिला साधी आठवणही नसते....
कारण, ती एक आई असते!

तुम्ही मागायच्या आधीच,
तिला तुमची इच्छा माहित असते...
ती पूर्ण करणे हीच,
तिची महत्वाकांक्षा होऊन जाते....
कारण, ती एक आई असते!

कितीही रागावली चिडली तरी,
मायेच्या पदराने ती तुमचे डोळे पुसते...
तिच्या अश्रूंची धार मात्र,
तेव्हाही सतत वाहत राहते....
कारण, ती एक आई असते!

तुमच्या यश-अपयशाची,
ती एकमेव साक्षीदार असते...
कठीण प्रसंगातही तुमच्यामागे,
ती खंबीरपणे उभी असते...
कारण, ती एक आई असते!


तुम्ही कितीही लांब गेलात,
तरी मनाने ती तुमच्याच बरोबर असते..
तुम्ही लपवलेली प्रत्येक गोष्ट,
तिला कधी न कधी नक्कीच कळते....
कारण, ती एक आई असते!

तुमच्या मोठेपणातही ती,
तुमचं बालपण शोधत असते...
तुम्ही कितीही मोठे झालात,
तरी ती कधीच मोठी होत नसते...
कारण, ती एक आई असते!

Tuesday, February 5, 2013

Just a Thought..

सगळ्या भावना शब्दात
उतरवता येतातच असं नाही,
कदाचित,
शब्दांच्या सीमेत भावनांना
जखडून ठेवणंच बरोबर नाही..

शांततेला आवाजासारखी सीमा नाही,
पण तिच्यातच खरं सामर्थ्य आहे..
न बोलता,
नुसत्या स्पर्शाने एकमेकांना समजून घेण्यातच,
तर प्रत्येक नात्याची परिपूर्णता आहे!