ती भाबडी, ती निरागस,
नाजूक तुकडा काळजाचा!
ती हसरी, ती लाजरी,
अन् चिवचिवाट घराचा!
ती लेक लाडाची.....
जणू एक रंग निर्मळ प्रेमाचा!!
ती खट्याळ, ती खोडकर,
भागीदार दंगा-मस्तीचा!
ती ओळख, ती साक्षीदार,
खरा सखा बालपणीचा!
ती बहीण हळवी...
जणू एक रंग अखंड सोबतीचा!!
ती आधार, ती सहचारिणी,
साथीदार सुख-दुःखाचा!
ती समीक्षक, ती ताकद,
अन् विश्वास जान्मोजन्मीचा!
ती बायको, अर्धांगींनी....
जणू एक रंग एकत्र निभवायचा!!
ती काळजी, ती माया,
एक कोपरा, सगळ्यात हक्काचा!
ती संस्कार, ती शिल्पकार,
आयुष्याला आकार देणारा!
ती आई, जन्मदात्री...
जणू एक रंग अखंड ममतेचा!!
ती स्तोत्र, ती गोष्टी,
एक झरा परंपरेचा!
ती ओढ, ती लाड,
डब्बा चविष्ट पदार्थांचा!
ती आजी, ती पणजी....
जणू एक रंग उबदार कुशीचा!!
ती गप्पा, ती चर्चा,
एक साथी जीवाभावाचा!
ती संगत, ती सल्ला,
न मागताच मिळणारा!
ती सखी, मैत्रीण....
जणू एक रंग आपुलकीच्या धाग्याचा!!
ती मावशी, ती मामी,
ती काकू, ती आत्या,
ती समर्पण, ती सय्यम,
पाया सगळ्याच नात्यांचा!
ती स्त्री, ती शक्ती,
जणू एक रंग अफाट जिद्दीचा!!
ह्या सप्तरंगात रंगताना,
कधी विसरू नकोस स्वतःला...
घे विसावा, जोपास छंदांना...
अन् घाल गवसणी आकाशाला!!
घाल गवसणी आकाशाला!!!!
©️ सोनिया