Friday, December 9, 2011

असेच कधीतरी

अवेळीच कधी,
दाटून येतो अंधार,
ओली होते माती,
अन हवा वाहते गार…
पण पाऊस, देतो हुलकावणी!!
अन हसतो निसर्ग सूर्यकिरणे पसरुनी……..

असेच कधी,
विचारांच्या चक्रीवादळात…..
अस्वस्थ होते मन,
पापण्या किंचित ओलावतात……
पण अश्रू, देतात हुलकावणी!!
अन हसतो आपण आवंढा गिळूनी..........

Wednesday, December 7, 2011

प्रेम...

तू माझ्याबरोबर येणार नाहीस,
हे मला आधीच ठाऊक होतं!
पण,
मागे वळून पाहिल्याशिवाय,
तू पुढे जाणार नाहीस..........
हे सुद्धा निश्चित होतं!!

तुझ्यावाचून मी,
हे जरी अशक्य होतं!
माझ्यावाचून तू,
हे मात्र सहज शक्य होतं!!

तरी
,
तू मागे वळून पाहिलंस,
हे सुद्धा कमी नव्हतं!
तसं करवून घेण्याइतकं तरी,
माझ्या प्रेमात सामर्थ्य होतं!!

Monday, December 5, 2011

धुक्यातून.......................

धुक्यातून उमलत आहे, मंद ही पहाट....

सरली ही पण रात राणी, पाहू किती वाट!!


छुम-छुम पैंजण दावून गेले,

तुझीच प्रतिमा माझ्या स्वप्नी....

भूर-भूर उडती काळे कुंतल,

लाजुनी हसता झुरवतेस मनी.....

लाजुनी हसता झुरवतेस मनी!!

धुक्यातून......................


शिंपल्यातल्या दवबिंदूसम,

तुझे नि माझे व्हावे मिलन!!

मन-मंदिरी ह्या ठेवीन कोरून....

तुझ्या सवेचे सुंदर ते क्षण!

तुझे नि माझे सुंदर ते क्षण!!

धुक्यातून.......................

Thursday, November 24, 2011

चारोळी

साठवलेलं पाणी वाहत नाही म्हणतात....
पण हा नियम अश्रूंना लागू होत नाही...
कितीही बांध घाला, धरणं बांधा......
त्यांना वाहायला कधी, काही कारणही लागत नाही!!

Thursday, November 10, 2011

पहिला पाऊस

पहिला पाऊस!! येतांना
अनेक आठवणी घेऊन येतो....
आणि जातांना स्वतःलाच
आपल्या डोळ्यात साठवून जातो!

कागदाची होडी सोडतांना,
चिखलात भिजलेलं बालपण!
अन सरीवर सर झेलणाऱ्या,
मैत्रीतलं स्वच्छंदी तरुणपण!
आता तोच नकळत आपली नजर कशी...
दोरीवरच्या कपड्यांवर आणून ठेवतो?

"ये रे ये रे पावसा" म्हणत,
त्याला साद घालणारे आपण!
"चिंब पावसानं रान" ऐकत,
न भिजताच शहारणारे आपण!
आता 'अगोबाई-धागोबाई" चे,
बोबडे बोल ऐकण्यात कसे रमून जातो?

फक्त पाऊसच असतो असा,
सगळ्यांना सुखावणारा....
"रुटीन" मधल्या ताणाला,
एका क्षणात घालवणारा...
प्रत्येकाला आपल्या मनातल्या कुपीत,
एक चक्कर मारून आणणारा....
आणि तोच कसा जातांना स्वतःलाच,
आपल्या डोळ्यात साठवून जातो??

Friday, September 30, 2011

२ ओळ्या.....

नजरानजर टाळणारी तुझी धडपड वाया गेली...
गालारील हसरी खळी, सर्व काही सांगून गेली!!

Thursday, September 29, 2011

A Special One

Yes, its a special poem gifted to me by a friend....
-------------------------------------------------------------------------
A relationship which has lasted over more than a decade,
Makes me proud about being a part of it

A relationship which started being students
at the same college as undergraduates

A relationship that has just not passed
but excelled in all tests of time

A relationship far above just being friends
but with whom you can be just yourself

So,
When it hurts to look back,
and you're scared to look ahead,
take a look beside you and
I will be there

Thanks for being there for all these years,
and continuing ahead as a silent supporter.

Tuesday, September 27, 2011

विचार

विचारांना ह्या आपल्या
कधी कंटाळा का येत नाही?
'घ्यावी जरा विश्रांती',
असं कधीच कसं वाटत नाही?

दिवस असो की असो रात्र,

ना भान त्यांना वेळेचं
घरीच नाही तर बाहेरही....
ना बंधन त्यांना जागेचं...
कुठेही कधीही जायला,
त्यांना परवानगी का लागत नाही?

कधी हसू तर कधी आसू,

गाली आपुल्या रंगवतात...
बुद्धी आणि मनामधले,
वादविवादही घडवतात!
इतके कष्ट घेऊनही,
त्यांना थकवा कसा जाणवत नाही?

त्यांच्यावर कितीही रागावलो,

तरी साथ आपली सोडत नाहीत!
त्यांना दूर सारायचं म्हणलं तर,
आपल्यालाही ते सोडवत नाहीत...
त्यांच्याइतकं स्थितप्रज्ञ रहायला,
आपल्याला का कधी जमत नाही?

Friday, September 23, 2011

कळी आणि फूल

कळीच फूल होणं,
टाळता येत नाही....
ती फांदीवर असली तरी,
आणि नसली तरीही....

तिनी फक्त फुलत राहायचं,
रंगानी अन गंधानी.......
तिची इच्छा असली तरी,
आणि नसली तरीही....

गजऱ्यातली असो वा गुछयातली,
बागेतली असो वा वाहलेली,
तिनी प्रसन्न हसायचं!
कुठे दुखत-खुपत असलं तरीही....

हाच माझा स्वधर्म!!
असं म्हणत शेवटपर्यंत,
तिनी दरवळत राहायचं!
सुकून निर्माल्य झालं तरीही.....!!!!


Wednesday, September 21, 2011

पाऊस

आले आभाळ भरून,
सांगे गार गार वारा...
थेंब टपोरे पाण्याचे,
अशा बरसती धारा!

नसे अत्तरही जसे...

ओल्या मातीचा हा गंध!
नभी रांगोळीचे जणू...
इंद्रधनू सात रंग!!

काही क्षणातच सरेल...

हा ऊन-पावसाचा खेळ...
तरी खुणावते सृष्टी...
हीच ती भिजण्याची वेळ!!

चिंब होऊनिया आज,

दिली आश्रुंनाही वाट!
तुझ्या आठवणीत रमते....
मी अशीच दर पावसात!!!!

सखी

कवितेचा थोडक्यात आशय:
घर, घरातली माणस, नोकरी, ह्या सगळ्यांना सांभाळता सांभाळता ह्या सखीला स्वतःकडे बघायला, आवडी-निवडी जपायला वेळच मिळत नाही...
तिचं अस्तित्व ती विसरलीये..त्याबद्दल माझ्या मनात आलेले विचार......

सखी
मोकळ्या हातांनी तू हल्ली,
शोधतांना दिसतेस काहीतरी...
मनातली अस्वस्थता,
ह्यालाच म्हणत असावेत!!

जातेस उशिरा कामावर,

अन येतेसही लवकर!
कामातलं असमाधान....
ह्यालाच म्हणत असावेत!!

सगळ्यांच्यात गप्प असतेस.......

अन शून्यात हरवून जातेस!
गर्दीतला एकटेपणा.........
ह्यालाच म्हणत असावेत!!

तुझ्यातला ओलावा,

चेहऱ्यावरच हसू,
तुझी कामाची झिंग,
आमच्या मनातली "तू".....
कुठे ग हरवून आलीयेस?
असं काय झालंय सखे,
की तू, "तुलाच" अशी विसरलीयेस?

Tuesday, September 20, 2011

विसरशील का?

विसरशील का? विसरशील का?
मला कधी तू विसरशील का?
विचार ना कधी तुझ्या मनाला
मला कधी रे विसरशील का?

भेट आपली पहिली-वहिली,
गारठलेल्या संधीकाली....
अनेक स्वप्ने, अनेक आशा,
चांदण्यासवे लेवून आली!!
रंगवलेल्या त्या स्वप्नांना,
पुन्हा कधी रे पाहशील का?
विसरशील का?

शब्दांच्या पलीकडले....
भाव दाटले माझ्या नयनी!
ह्रदय तार छेडिलीस तू अन,
सूर उमटले ओठामधुनी!!
गुणगुणलेल्या त्या गाण्याला,
पुन्हा कधी तू गाशील का ?
विसरशील का?

Saturday, August 13, 2011

मन

मन माझ मागे धावतय,
प्रवासातल्या आठवणीत रमतय,
चहाच्या
बागेत हुंदडतय,
तुझ्या सहवासात शहारतय,
जणू परत तिथे जायचं म्हणतंय!
हो , मन माझ मागे धावतय!!


नारळाच्या झाडांना,
समुद्री किनारांना,
हिरव्यागार डोंगरांना,
प्राण्या साठवून ठेवतय,
जणू परत तिथे जायचं म्हणतंय!
हो , मन माझ मागे धावतय!!

जंगलातल्या प्राण्यांना,
तळ्यातल्या पक्ष्यांना,
मसाल्यातल्या पदार्थांना,
नाव अन गंधासहित आठवतंय
जणू परत तिथे जायचं म्हणतंय!
हो , मन माझ मागे धावतय!!

त्या स्पर्शाला, त्या श्वासांना,
मन पुन्हा पुन्हा अनुभवतय,
निशब्द लयीतील त्या गाण्याचे बोल,
आजही ओठांवर गुणगुणतय,
जणू परत तिथे जायचं म्हणतंय!
हो , मन माझ मागे धावतय!!

नसेल पुढे ह्यातलं काही,
राहतील
फक्त आठवणी,
पण
उजळतील दिशा दाही,
उलगडतील
मनीची पाने नवी..
लिहितील
पुन्हा एक काव्यकहाणी!
आठवणींना
बरोबरघेऊन अन,
आपल्या
हातात नवी सोबत ठेऊन!
मन
त्याच क्षणाची वाट पाहतंय........!!








Thursday, August 11, 2011

सांग न ग आई.......

सांग न ग आई.......

हे असं सगळं व्हायलाच पाहिजे का?
आई, हे
असं सगळं व्हायलाच पाहिजे का?

तूच तर मला शिक्षणाचे बाळकडू पाजलेस,
तूच नाही का संस्कारांनी मला मोठे केलेस,
बाबांनीच तर बोट धरून चालायला शिकवले,
भांडूनही भावाशी ज्या मनमोकळं बोलले...
त्या तुम्हा सर्वांना सोडून, मी लांब जायलाच पाहिजे का?
सांग , हे
असं सगळं व्हायलाच पाहिजे का?

तुम्ही मला प्रेमानी जे नाव दिले,
ज्या नावानी माझी वेगळी ओळख दिलीत!
यश-अपयशाचे ऋतू मी ज्या घरात पाहिले,
माझ्या आसवांना ज्यानी त्याच्या मनात लपविले!
त्या नावाला घराला, मी बदलायलाच पाहिजे का?
सांग ,हे
असं सगळं व्हायलाच पाहिजे का?

वीस वर्ष तुमच्या प्रेमात मी ओथंबून न्हाहले,
अन दोन महिन्यांपुर्वीच तर मी "त्याला" पाहिले!!
त्याच्या राज्यात असतील मला सगळेच
असंनोळखी,
एका क्षणातच तरीही माझी बदलतील नाती...
ह्या नवख्या माणसाला, मी सर्वस्व द्यायलाच पाहिजे का?
सांग आई, हे
असं सगळं व्हायलाच पाहिजे का?

निर्णय

निर्णय घ्यायचाय आजच
अन तोही पूर्ण विचारांती,
कारण त्यावरच लिहिल्या जातील
उद्याच्या काही काव्यपंक्ती!!

आपलेही अन परकेही
आता देतील अनेक सल्ले.....
पण डोक्यावर आपल्याच आहे
त्या जबाबदारीचे ओझे!!

स्वीकारायचेत परिणाम
चांगले अन वाईटही,
कारण असतातच दोन बाजू...
नाण्याला कुठल्याही!!

म्हणुनच,
निर्णयाच्या मागे
एक ठाम विचार हवा....
कारण तोच असेल आपल्या
भविष्याचा ठेवा!!